बारामती : राज्यात मेंढपाळांवर सातत्याने अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. मात्र, मेंढपाळांवरील हल्लयाबाबत सरकार गांभीर्याने पाहत नाही, त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येत नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राच्या लोकशाहीला न शोभणारी गोष्ट आहे. वेळीच मेंढपाळांवरील हल्ले खोरांवर कारवाई तसेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अन्यथा मेंढपाळांचा भव्य मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल,असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बालेकिल्यात ‘राष्ट्रवादी’ चे पदाधिकारी बापुराव सोलनकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. याबाबत सोलनकर यांनी निवेदन दिले आहे.त्यावर सोलनकर यांच्यासह संपतराव टकले, माणिकराव काळे यांच्या सह्या आहेत.
राज्यातील मेंढपाळ वणवण भटकतात. ऊन, वीज, वारा, पाऊस यांचा विचार न करता तसेच आपला जीव धोक्यात घालून मेंढ्या सांभाळत आहेत. वीज पडून अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत, अनेक मेंढपाळांनी जीव गमावला आहे. या संकटाच्या काळात माणुसकी दाखवणे गरजेचे आहे.परंतु काही ठिकाणी मेंढपाळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखण्याची गरज आहे. सरकारने यापुढे हल्ले करणाऱ्यांना जरब बसेल असे शासन केले पाहिजे. समाज कंटकांकडून होणारी अरेरावी, जातीवाचक शिवीगाळ, मेंढ्या चोरून नेणे, काही गावात स्थानिक लोकांकडून मेंढपाळ समाज बांधवांना मारहाण, तसेच काही ठिकाणी मेंढपाळांनी आपला जीव गमवला आहे.मेंढपाळांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे अशा हल्ला करणाऱ्या नराधमांवर कडक शासन करा. त्यांच्या कुटुंबांना बंदुकीचा परवाना व संरक्षण द्या,अशी मागणी सोलनकर यांनी केली आहे.—————————————