सिल्लोड - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथं शिंदे गटाचे आमदार आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपाच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. सिल्लोड आणि सोयगावमध्ये सत्तारांची हुकुमशाही असल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जात होता. काही दिवसांपूर्वी सत्तार समर्थकांनी भाजपाचेरावसाहेब दानवे यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढल्याचं बोललं जाते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. सिल्लोडला मिनी पाकिस्तान म्हटल्यामुळे दानवेंविरोधात याठिकाणी मोर्चा निघाला होता. आता सत्तार समर्थकांच्या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी अब्दुल सत्तारांविरोधात मोर्चा काढला. या मोर्चात आंदोलकांनी वेगवेगळे बॅनर्स हातात घेतले होते. गेल्या १५ वर्षापासून अब्दुल सत्तार हिंदू लोकांची मते घेतो आणि हिंदूंवर अत्याचार करतो त्याविरोधात आमचा मोर्चा असल्याचं आंदोलकांनी म्हटलं.
काय आहे आरोप?
अब्दुल सत्तार यांनी महिनाभरात त्यांच्याकडील बळाचा वापर करून पोलिसांवर दबाव आणून आमच्या ५० लोकांवर गुन्हा दाखल करायला लावले. गोरगरिबांच्या जमिनी हडपण्याचं काम सत्तारांनी केले. लोकांच्या कोट्यवधीच्या संपत्ती कवडीमोल दराने खरेदी केल्या. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आहे. या मोर्चात भाजपा नेत्यांनी सहभाग घेतल्याचं आंदोलकांनी सांगितले. महाराष्ट्रात युवकांना नोकरी मिळावी यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असताना दुसरीकडे या तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री वेगवेगळ्या जातीतील हिंदू तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्यात मराठा, माळी, कोळी अठरापगड जातीतील मुले आहेत त्यामुळे सत्तारांविरोधात हा मोर्चा आहे असंही आंदोलक म्हणाले.
रावसाहेब दानवेंविरोधात निघाला होता मोर्चा
सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान म्हणून उल्लेख करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या गुरुवारी सिल्लोडमध्ये मोर्चा निघाला होता. दानवे यांनी बेताल वक्तव्य थांबवावे ,सिल्लोड तालुक्याची बदनामी करू नये नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरावर मोर्चा काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता.