मुंबई :शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढेही आपल्याच देखरेखीखाली राहील, असे आदेशवजा पत्र गृहविभागाने पोलिस महासंचालक (होमगार्ड व नागरी संरक्षण) तथा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना दिले असले,तरी तपासाची सूत्रे कायम ठेवण्याबाबत स्वत: मारिया अनुत्सुक असल्याचे समजते.मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी मारिया यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली असली, तरी या फेरबदलाचे कवित्व अजुन संपलेले नाही. शीना बोरा हत्याकांडाचा तपास नवे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांच्या नेतृत्वाखाली होणे अपेक्षित असताना तपासाची सुत्रे मारिया यांच्याकडेच राहातील, असे विधान करून अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी.बक्षी यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकले. मारिया यांच्यासारख्या अधिकाऱ्याला या प्रकरणाने जावे लागल्याने माध्यमांमधून सरकारवर टिकेचे सूर उमटले होते. ही टीका टाळण्यासाठी आणि या उचलबांगडीशी शीना बोरा प्रकरणाचा संबंध नव्हता, हे दाखविण्यासाठी मारियांकडेच हा तपास ठेवण्याची भूमिका सरकारने घेतली. तपासाची सुत्रे कायम ठेवण्याबाबत मारिया यांना बुधवारीच पत्र देण्यात आले, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी वृत्तसंस्थेला दिली. मात्र प्रत्यक्षात तसे पत्र गुरूवारी देण्यात आल्याचे समजते.सरकारने पत्र दिले असले तरी मारिया हा तपास आपल्याकडे ठेवण्यास इच्छुक नसल्याचे समजते. गृहविभागातील सुत्रांनीदेखील त्यास दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)
तपासाबाबत मारिया अनुत्सुक
By admin | Published: September 11, 2015 3:16 AM