ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 8 - कृषी उत्पन्न बाजार समितीत नियोजित नवीन व्यापारी संकुल उभारणीचा तिढा कायम असून, या मुद्द्यावरून बाजार समितीच्या धान्य यार्डातील बंद शनिवारीही कायम होता. संकुल होऊ नये यासाठी मार्केट यार्ड अडत असोसिएशने बंद पुकारला आहे. या बंदचा शनिवारी दुसरा दिवस होता. या बंदमुळे धान्य यार्डात आलेल्या धान्याचा लिलावही झाला नाही.
८० क्विंटल आवक
सध्या फक्त उडदाची आवक सुरू आहे. उडदाची जवळपास ८० क्विंटल आवक झाली. परंतु अडतदारांच्या बंदमुळे माप होऊन शेतकऱ्यांना पैसे मिळू शकले नाहीत. काही शेतकरी धान्य परत घेऊन गेले. तर काहींनी अडतदारांकडे धान्य सोडले व ते परत घरी निघून गेले. बंदमुळे १३० हमाल व मापाडी यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही हमाल बांधवांना व्यापाऱ्यांनी सणासुदीमुळे मदत केली.
शनिवारी सुट्टीची स्थिती
दुसरा शनिवार असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे बाजार समितीमध्ये कुठलेही व्यवहारदेखील झाले नाही. ९ रोजी रविवारची सुट्टी असल्याने बाजार समिती बंदच राहील. शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
कागदपत्रांची जमवाजमव
नवीन संकुलासंबंधी विरोधावरून महापालिका आयुक्त यांनी येत्या १८ पर्यंत कामास स्थगिती दिली आहे. याबाबत आयुक्त ८ रोजी सुनावणी घेणार असून, सुनावणीसंबंधी प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी व इतर कार्यवाहीसाठी व्यापारी किंवा अडतदार कागदपत्रांची जमवाजमव करीत होते. त्यासाठी असोसिएशनचे काही सदस्य सकाळपासून माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले.