धाड : येथील आठवडी बाजार करता कायमस्वरुपी जागा नसल्याने सध्या स्थितीत आठवडी बाजार चक्क धाडच्या एस.टी.बसस्थानकाच्या आवारात भरत असून या ठिकाणी बाजारासह एस.टीच्या समस्या वाढीस लागल्या आहे.
गेल्या अनेक वर्षापासून धाडमध्ये आठवडी बाजार करता जागा उपलब्ध नसल्याने कधी हा बाजार रोडवर तर कधी हा बाजार धरणाचे बुडीत क्षेत्रात भरत आहे. साधारण २0 हजार लोकसंख्या असणार्या धाडचा आठवडी बाजार सोमवारी भरत असून गावालगत बाजारासाठी जागा उपलब्ध नसल्याने गावातील एस.टी.बसस्टँडच्या लगत असणार्या धरणाचे बुडीत क्षेत्रात आठवडी बाजार भरण्यास सुरुवात झाली. मात्र या ठिकाणी बाजारातील व्यापार्यांची संख्या वाढल्याने सदर आठवडी बाजार हा बसस्टँडच्या आवारात भरत आहे. वास्तविक सदर बाजाराची हर्रासी करण्यात येऊन जि.प. व ग्रा.पं.यांचे माध्यमातून बाजाराचे बैठक वसुलीचा ठेका हा दरवर्षी कंत्राटदारांना लाखो रुपयांमध्ये देण्यात येतो. या ठिकाणी बाजारातील व्यापारी वर्गाकडून बैठकीच्या स्वरुपात प्रत्येक आठवडयाला कर वसुली नियमित करण्यात येते परंतु त्या प्रमाणात आठवडी बाजारात सुविधा देण्यात आल्या नाही. स्थानिक धरणाचे बुडीत क्षेत्रात ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यात येतो त्या जागेवर दररोज गावातील नागरिक प्रात:विधीचा कार्यक्रम उरकत असतात. पावसाळयात या जागेवर चिखल घाण साचते तर धरणाचे पाणी बाजाराचे जागेवर साचत असल्याने हा बाजार चक्क वाहतुकीचे रोडवर भरत असतो. अशा अनेक समस्या असणारा येथील आठवडी बाजाराला अजुनही कायम स्वरुपी जागाच मिळाली नसल्याने घाणीचे साम्राज्यात भरणारा बाजार बेजार झाला आहे. तर भरीस भर सध्या एस.टी.स्टँडच्या आवारातच हा बाजार भरत असल्याने या ठिकाणी बस येण्यास व जाण्यास अडचणीचे ठरत आहे.