विठ्ठल कवडे, पंढरपूरकृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी, असा आपला संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित ‘पंढरी कृषी’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर तर व्यासपीठावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आदी उपस्थित होते.बाजारपेठ आवश्यक आहे, ती आपल्याला जिवंत ठेवायची आहे, परंतु शेतकऱ्यांना मारून ती जिवंत ठेवायची नाही. शेतकऱ्यांची बाजारपेठ शेतकऱ्यांच्याच हातात असली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतला. आपण शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ मुक्त केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत राज्यातील शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत राज्य समृद्ध होणार नाही. राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून ८२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. शेतकरी आजही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम राबविले. त्यामध्ये राज्यात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
बाजारपेठ शेतकऱ्यांचीच असावी
By admin | Published: July 15, 2016 3:30 AM