नाना हिवराळे/ खामगाव (जि. बुलडाणा) : कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने कापसाची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती; मात्र शेतकर्यांची मागणी व त्यांचे हित लक्षात घेऊन दिवाळीपूर्वीच कापूस खरेदीचा शुभारंभ करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. गुरुवार व शुक्रवारी कापूस खरेदी सुरू केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात राज्यात २0 खरेदी केंद्रे सुरू होत आहेत. शेतकर्यांना योग्य हमी भाव देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने खरीप हंगाम २0१५-१६ साठी कापूस खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहकार व पणन महासंघ मंत्रालय (मुंबई) यांनी दिवाळीपूर्वीच व पहिल्या टप्प्यात राज्यात २0 खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले आहेत. पणन महासंघातर्फे खरेदी करण्यात येणार्या कापसाचे चुकारे शेतकर्यांना आरटीजीएस व एनईएफटीद्वारे करण्याचे धोरण सीसीआयप्रमाणेच पणन महासंघाने ठरविले आहे. शेतकर्यांचे व्यापार्यामार्फत शोषण होऊ नये, राज्य शासनाच्या निर्देशानुसार पणन महासंघाने हमी दरावर कापूस खरेदी दिवाळीपूर्वीच सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक प्रसेनजित पाटील यांनी कळवले.
पणन महासंघाची कापूस खरेदी आजपासून!
By admin | Published: November 05, 2015 2:09 AM