अमरावती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘मार्केटिंग’ केले जात आहे. त्याकरिता विशेष रथ तयार करण्यात आला असून, हा रथ गाव-खेड्यांत योजनांचा प्रचार व प्रसार करीत आहे.आदिवासी व सामाजिक न्याय विभागाकडून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास, आर्थिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, डझन, दोन डझनभर योजना असतानाही त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर समाजकल्याण अधिका-यांना नवबौद्ध आणि अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहचविण्यासाठी कृती आराखडा दिला आहे. मार्च एंडिंगनंतर आता १५ दिवसांनी योजनांसाठी नव्याने निधी, अनुदान मिळणार असल्याने सामाजिक न्याय विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांपासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी समाजकल्याणचे विभागीय व प्रादेशिक उपायुक्तांना दिल्या आहेत. योजनांच्या ‘माकेटिंग’साठी गाव-खेड्यात असलेल्या नवबौद्ध, अनुसूचित जाती संवर्गातील वस्ती, वाड्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. चारचाकी वाहनाचे प्रचार रथ तयार करण्यात आले असून, या रथावर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती होर्डिंग्ज, पोस्टरद्वारे अंकित करण्यात आली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे छायाचित्रसुद्धा रथाच्या दर्शनी भागात असल्याने हा रथ ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देताना लाभार्थ्यांना योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, दस्तऐवज, शैक्षणिक पात्रतेबाबत सांगितले जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहय्य विभागाकडून ८ ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह राबविला जाणार आहे. ९ एप्रिल रोजी योजनांबाबत माहिती प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
या आहेत ‘समाजकल्याण’ योजनाराजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार शैक्षणिक योजना, वैद्यकीय तंत्रनिकेतन, कृषी पशुवैद्यकीय व अभायांत्रिकी व्यावसायीक पाठ्यक्रम पुस्तक पेढी योजना, सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, तालुका स्तरावर १०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी शाळा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान व सबळीकरण योजना, बचत गटाच्या महिलांसाठी पॉवर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजना, गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल वाटप, कन्यादान योजना, अत्याचारास बळी पडलेल्या अनुसूचित जाती व जमातींच्या कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य, रमाई आवास घरकुल योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, औद्योगिक सहकारी संस्था भाग भांडवल व कर्ज, सामाजिक कार्यासाठी पुरस्कार आदी योजनांचा समावेश आहे.