लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत आलेली सगळी मरगळ बाजूला सारून पुन्हा एकदा राज्यभरातील बाजारपेठा चैतन्याने फुलल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत दिसून आले. दिवाळीच्या आधी आलेला रविवार तर खरेदीचा सुपर संडेच ठरला. कपडे, घरसजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. कोरोनामुळे वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करणारा सण-उत्साह बाजारपेठेत दिसल्याने व्यापाऱ्यांचीही दिवाळी यंदा ‘गोड’ ठरणार आहे.
पुणे‘सोनियाचा दिनु’ कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. पुणेकरांचा इलेक्ट्रॉनिक मसाजर, वजन काट्यांच्या खरेदीकडे ओढा दिसून आला. कपड्यांवर मॅचिंग ज्वेलरी हवी असल्याने बांगड्या, ब्रेसलेट यासारख्या आर्टिफिशयल ज्वेलरीच्या खरेदीकडे महिलांचा कल होता. वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही, सोफासेट, ओव्हन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी झाली.
कोल्हापूर खरेदीसाठी महापूर कोल्हापुरात दिवाळीनिमित्त खरेदीला उधाण आले होते. कपड्यांसह सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाल्याने अनेक ठिकाणी कोंडी झाली होती. रेडिमेड कपड्यांच्या दुकानात आकर्षक ऑफर देण्यात आल्या. आकाशकंदील, नियमित पणत्यांसह विद्युत पणत्यांना अधिक पसंती आहे. बालगोपाळ किल्ल्यांचे साहित्य खरेदीसाठी आग्रही दिसले.
औरंगाबाद कापड बाजारावर उड्या रविवार औरंगाबादकरांनी कापड खरेदी करून सार्थकी लावला. शहराच्या गुलमंडी, पैठणगेट, सिटीचौक, निराला बाजार, औरंगपुरा या बाजारपेठांसह गल्लीबोळातील दुकानांमध्येही झुंबड उडाली. कुंभारवाडा आणि रंगार गल्लीतही पाऊल ठेवण्यास जागा उरली नाही. साड्यांच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांना उसंत मिळाली नाही.
नागपूर होम अप्लायन्सेसवर भरसर्वच बाजारपेठांमध्ये लोकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह होता. लोकांनी कपड्यांसह घर सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. लहान मुलांचे रेडिमेड कपडे, बेडशीट, गृह सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीवर लोकांचा भर होता. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम आणि दुकानांमध्ये होम अप्लायन्सेस, टीव्ही खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
मुंबई कपडे खरेदीला पसंतीकपडे खरेदी करण्याकडे मुंबईकरांचा सर्वाधिक कल दिसून आला. कपड्यांव्यतिरिक्त सजावटीच्या साहित्यालाही मोठी मागणी आहे. विशेषत: आकाशकंदील, पणत्या आणि रांगोळीच्या साहित्याला मोठी मागणी आहे. एलईडी दिव्यांचे विविध प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत. परंतु, त्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.