प्रमोद सुकरे
कराड - पाटणचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली मरळी (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी अंतिम दिवशी शुक्रवारी (दि. 25) फक्त शंभूराज देसाई समर्थकांचेच अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोधच झाली. फक्त त्याची घोषणा बाकी आहे. पण याचे सेलिब्रेशन चक्क गुवाहाटीत करण्यात आले. तेथे असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर गट नेते एकनाथ शिंदेंसह अन्य आमदारांनी शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
राज्यात शिवसेनेतील बंडामुळे राजकीय उलथापालती सुरू आहेत. एकनाथ शिंदेसह ४० हून जास्त आमदार गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. मात्र तोवर पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र आसामच्या राजधानीत असलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी तेथूनच सर्व काही हालचाली केल्या. विरोधकांनी अर्जच दाखल न केल्याने निवडणुकीत बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, यासाठी बंड केलेल्या शिवसेना आमदारांनी गुवाहाटीत तळ ठोकला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पहिल्या दिवसांपासून त्यांच्या समवेत आहेत. कारखाना निवडणुकीच्या प्रक्रियेवर त्यांचे तेथून लक्ष होते. शुक्रवारी सायंकाळी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.या यशाबद्दल बंडखोर आमदारांनी शंभूराज देसाईंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो देखील पाटणमधील समर्थकांनी व्हायरल केले आहेत.
देसाईंच्या गोटात दुहेरी यशाचा जल्लोषगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कारखान्याच्या निवडणुकीची अगोदरच रणनिती आखली होती. उमेदवार निश्चित केले होते. स्वत:चा उमेदवारी अर्ज घेऊन भरून ठेवला होता. सूचक, अनुमोदकामार्फत तो भरला होता. तसेच विरोधी पाटणकर गट विरोधात पॅनेल टाकणार नसल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकताच बाकी होती. ही संधी साधून त्यांनी आपला मुलगा यशराज याचे लाँचिंग केले. अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे तरूण चेहर्याची सहकारात एन्ट्री आणि बिनविरोध निवडणूक, असा दुहेरी यशाचा जल्लोष शंभूराज देसाईंच्या गोटात साजरा होत आहे.