मुंबई : देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘मार्मागोवा’ (मुरगाव) या युद्धनौकेचे माझगाव गोदी येथे शनिवारी जलावतरण करण्यात आले. माझगाव गोदीत बांधणी झालेल्या या युद्धनौकेने नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रात प्रवेश केला.सागरी सीमांच्या रक्षणासाठी मार्मागोवा महत्त्वाची भूमिका बजावणार असून, या युद्धनौकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका ५६ किलोमीटर प्रतितास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे. युद्धनौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. त्याचबरोबर युद्धनौकेवर इस्रायलमध्ये विकसित झालेली मल्टीफंक्शन सर्व्हिलन्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून मार्मागोवाला संबोधले जात आहे. विशाखापटणमच्या शृंखलेतील ही दुसरी युद्धनौका आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या वतीने नियोजित वेळेआधीच युद्धनौकेची बांधणी पूर्ण झाली असून, या कंपनीकडून सहा पाणबुड्याही बनविण्यात येणार आहेत. दरम्यान, या युद्धनौकेची बांधणी पूर्ण झाली असली तरी यावर क्षेपणास्त्रे बसविण्यात आलेली नाहीत. (प्रतिनिधी)>जगातील सर्व युद्धनौकांच्या तुलनेत मार्मागोवा ही युद्धनौका अधिक शक्तिशाली आहे. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्मागोवा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. मेक इन इंडियाच्या मोहिमेंतर्गत बांधण्यात आलेली ही दर्जेदार युद्धनौका आहे.- सुनील लांबा, प्रमुख अॅडमिरल, नौदल
मार्मागोवाचे जलावतरण
By admin | Published: September 18, 2016 5:09 AM