पुणे : लग्नाचे आमिष दाखवत ठेवलेले शरीरसंबंध तसेच स्त्रीला फसवून तिची संमती घेत तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तो त्या स्त्रीचा विश्वासघात व फसवणूक आहे. यानुसार लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ठेवलेल्या शरीरसंबंधातील आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. एका खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची नुकतीच पुनरुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या ताज्या निकालावरुन निर्णयावरुन मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. यानिमित्ताने ज्येष्ठ विधिज्ञांशी बोलून या निर्णयाचे विविध पैलु ह्यलोकमतह्णने समोर आणले आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, की कायद्यात स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाबाबत विशेष संरक्षण देण्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींचा कधी कधी गैरवापर होतो. जसे कौटूंबिक क्रौर्य याकरिता स्त्रियांना संरक्षणाची गरज असते. पण काही अपवादात्मक प्रकरणी एखादी वाट चुकलेली स्त्री नवराच नव्हे तर सासुला देखील तुरुंगात टाकते. शेवटी असे दिसून येते की, त्यांनी छळ केलेला नव्हता. त्याचप्रमाणे बलात्काराची प्रकरणे वाढत असल्याने हा स्त्रीयांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने भारतीय दंड संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यात दुरुस्ती करुन त्या स्त्रीची संमती तिची फसवणूक करुन मिळवली असेल तर अशा शाररीक संबंधाला बलात्कार म्हणता येईल. पण येथे फसवणूक हा शब्द आहे. म्हणजेज ही वस्तुस्थिती आरोपीनी दाखविलेली खोटी होती. सत्य त्या स्त्रीला माहिती नव्हते. असे असेल तर त्यास फसवणूक म्हणता येईल. भारतीय संस्कृतीमध्ये नुसत्या लग्नाचे आश्वासनच नव्हे तर साखरपुडा झाला असला तरी शरीरसंबंध ठेवण्याची नैतिक परवानगी नाही. म्हणजे ते दोघेही अनैतिकतेकडे झुकलेले आहेत. आणि ज्यादिवशी त्यांनी संबंध ठेवले त्यादिवशीच या स्त्रीचे लग्न करायचे नाही असे त्याच्या मनात होते. पण त्याने खोटे आश्वासन दिले होते. तरच अशाप्रकारची तक्रार दाखल करता येईल. अन्यथा त्या दोघांच्या संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार होणार नाहीत.
* स्वागतार्ह निर्णयसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे. यामुळे स्वैराचारावर बंधने येऊन कौटूंबिक संबंध टिकण्यास मदत होणार आहे. मात्र दुस-या बाजुला निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये याची काळही घ्यावी लागेल. कारण अनेकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पळवाटा शोधत त्या निर्णयांचा दुरुपयोग होताना दिसतो. या निर्णयाची दुसरी बाजु अशी, की प्रत्येक खटल्यातली घटना, संदर्भ, वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. सध्याचे शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक वातावरण अनेक गोष्टींकरिता पुरक असून त्यात मुलामुलींचे एकत्र राहण्यातून अडचणी समोर येतील. यातूनच एकमेकांवर आरोप करण्याकरिता पुरावा म्हणून या गोष्टीचा उपयोग केला जाईल. कदाचित अशाप्रकारच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाचा निर्णय असेल तर तो ह्यफुल बेंचह्ण कडे पाठवावा लागेल. - अॅड. एस.के.जैन (ज्येष्ठ विधीज्ञ)
*भीती वाटतेनिर्णयाचा गैरवापर होण्याची जास्त भीती वाटते. गेली २०-२५ वर्षे फौजदारी खटल्यांचे काम करीत असताना बलात्काराच्या घटनांमधले वास्तव समोर येत नसल्याचे पाहिले आहे. सुरुवातीला दोघांचे प्रेमसंबंध असतात. संमतीने दोघांमध्ये शाररीक संबंध प्रस्थापित होतात. लग्न करण्याच्या वेळी जात, धर्म तसेच आर्थिक अडचणी आल्याने त्यांच्यात वाद निर्माण होतात. यात ब-याचदा पालकांचा मुलाला विरोध असल्याने ते मुलावर बलात्काराचा खटला दाखल करतात. त्यामुळे भविष्यात या निर्णयाचा आधार घेऊन खोट्या तक्रारी दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. संमतीने राहणे, पुढे त्यातून संबंधात कटूता येणे, आयुष्यात दुसरा जोडीदार आल्यानंतर अगोदरचे नाते संपविण्याकरिता देखील अशाप्रकारे तक्रारी दाखल केल्या जातात. मात्र त्याबरोबरच हा निर्णय नियंत्रण व सुरक्षितता यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा असून अशाप्रकारच्या कायद्याची गरज आहे. - अॅड. प्रतिभा घोरपडे