पुसद (यवतमाळ) : अनैतिक संबंधातून विवाहितेवर भरचौकात चाकूचे तब्बल २१ वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना पुसद तालुक्यातील हिवळणी गावात शनिवारी सकाळी घडली.पूजा मस्के (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा मारेकरी धनराज चव्हाण याला खंडाळा पोलिसांनी अटक केली. पूजा सकाळी साडेनऊच्या सुमारास शेतात जात असताना धनराजने तिला गावातील भरचौकात गाठले आणि चाकूचे वार करून तिचा खून केला.पूजाचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. तिला एक मुलगाही आहे. पतीसोबत पटत नसल्याने काही वर्षांपासून ती माहेरी राहत होती. तिथे जवळच राहणाऱ्या धनराजशी तिचे प्रेम जमले. धनराजही विवाहित असून त्याला मुलगी आहे. त्याच्या पत्नीला या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्याने त्यांच्यात खटके उडू लागले होते, तसेच दोन्ही कुटुंबांतही यावरून अनेकदा वादविवाद झाले.आपले सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दीड महिन्यापूर्वी ब्रेकअप झाल्याने आपण पूजाला कायमचे संपविले, अशी कबुली धनराज याने दिल्याची माहिती पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली. (तालुका प्रतिनिधी)
अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून
By admin | Published: June 26, 2016 2:59 AM