बुलडाणा : लोेणार तालुक्यातील अजीसपूर येथील १६ वर्षीय मुलीचा मंठा येथील तरुणाशी होणारा विवाह मेहकर चाइल्ड लाइन आणि लोणार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर २८ फेब्रुवारी रोजी रोखण्यात आला.विष्णू आश्रुजी सुपेकर यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा येथील रामचंद्र नेमाजी लहाने यांच्या पांडुरंग नावाच्या मुलासोबत होत असल्याची माहिती मेहकर चाइल्ड लाइनच्या नरेंद्र पवार यांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन मुलीच्या जन्मतारखेची तपासणी केली आणि मुलीच्या पालकांना बालविवाह कायद्यानुसार मुलीचे लग्न करता येत नसल्याचे सांगितले. तसेच जबरदस्तीने अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल, अशी समजही दिली. यानंतर मुलीचे वडील सुपेकर यांनी बालविवाह कायद्याबद्दल माहिती नसल्याचे सांगून १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलीचे लग्न करणार न करण्याचे लेखी आश्वासन देऊन, लग्न थांबवले. (प्रतिनिधी)
बुलडाण्यात अल्पवयीन मुलीचा विवाह थांबविला
By admin | Published: February 29, 2016 4:24 AM