नागपूर : नागपुरातील एका प्रकरणात पत्नीने लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध लपविल्यामुळे विवाह रद्द ठरविणारा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला.गणेश व कविता (काल्पनिक नावे) यांचा २४ फेब्रुवारी २०१३ रोजी साखरपुडा तर, १३ जून २०१३ रोजी विवाह झाला होता. साखरपुड्यानंतर गणेश कविताला भेटायला बोलवित असे, परंतु कविता त्याला प्रतिसाद देत नव्हती. लग्नाच्या दोन दिवस आधी गणेशला निनावी फोन आला. संबंधित व्यक्तीने कविताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. यामुळे गणेशने कविता व तिच्या भावाकडे विचारपूस केली. परंतु, त्यांनी कानावर हात ठेवले. यामुळे गणेशने कविताशी विवाह केला. त्यानंतर गणेशला कविताची डायरी सापडली असता त्यात ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझी पत्नी आहेस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही’ असे लिहिले होते. यासंदर्भात खोदून-खोदून विचारणा केल्यानंतर कविताने प्रेमसंबंधाची कबुली दिली. तसेच, आई व भावाच्या दबावामुळे प्रियकराशी लग्न करू शकले नाही, असेही सांगितले.सामंजस्याने यातून मार्ग काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर गणेशने हिंदू विवाह कायदा-१९५५मधील कलम १२(१)(सी)अनुसार विवाह रद्द करण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. कौटुंबिक न्यायालयाने गणेशची याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध कविताने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय वैध ठरवून कविताचे अपील फेटाळले.
प्रेमसंबंध लपवल्यामुळे विवाह ठरवला रद्द
By admin | Published: March 26, 2016 1:43 AM