ऑनलाइन लोकमतटिटवाळा, दि. 13 - सात दिवसांपुर्वीच प्रेमप्रकरण असलेल्या मुलीशी वैदिक पद्धतीने सत्यप्रतीज्ञालेख लिहून लग्न करून पुन्हा घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्न करणाऱ्या त्या नवरोबा विरोधात पहिल्या पत्नीने पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १२ दिवसांचा कालावधी उलटला तरी आरोपींना अटक करण्यात न आल्याने पोलिसांच्या तपासावरही तक्रारदार मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, टिटवाळ्यात इंदिरानगर येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या दामिनी जोशी (१९) हिचे लग्न २७ एप्रिल २०१६ रोजी मुरबाडमध्ये राहणाऱ्या तेजस व्यापारी (२५) याच्याशी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाले. मात्र एक दिड महिन्यानंतर तेजस व्यापारी हा सुवर्णा चन्ने नामक तरूणीबरोबर फिरायला गेला. याबाबत त्याची दुसरी पत्नी दामिनी हिने तेजसकडे विचारणा केली असता त्याने सुवर्ण चन्ने या मुलीबरोबर २० एप्रिल रोजीच पहिले लग्न झालेले असल्याचे सांगितले. तसेच याबाबत सत्यप्रतिज्ञापत्र देखिल केल्याचे सांगितले. मात्र याचा जाब विचारणाऱ्या दामिनीला तिचा नवरा तेजस, सासू वर्षा, सासरा वसंत, तसेच चुलत दिर कल्पेश यांनी तिला शिवीगाळ करत मारझोड केली. हे सर्व सहन न झाल्याने दामिनीने सदरचा प्रकार आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातला. १५ ऑगस्ट रोजी त्यामुळे आणखी चिडून दामिनीला लग्नात दिलेले दागिने काढून घेऊन माहेरी हाकलून दिले. या बाबत दामिनीच्या वडिलांनी महिला व बाल विकास विभागाच्या टिटवाळ्यातील महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली. शिवाय हिंदू लोहार समाज महासंघात निवदेन देऊन सदरच्या समस्येवर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न केला. मात्र हिंदू लोहार समाजाच्या बैठकीला दामिनीचे सासरे वसंत व्यापारी हे अनुपस्थित राहिल्याने त्यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून असलेली नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अण्णासाहेब जोशी यांनी रद्द करून एक रूपया दंड ठोठावला. तसेच दामिनीची आपसात संगनमत करून फसवणूक-ठकवणुक करून स्त्रीधनाचा अपहार, तसेच आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय समाज संघाने घेतला. त्यानुसार दामिनी हिने तिचा नवरा, सासू, सासरा व दिराच्या विरोधात तालुका अर्थात टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस हवालदार कोर यांच्याकडे विचारणा केली असता गुन्हा दाखल होऊन दहा-बारा दिवस झालेले असून आपण पंचनामा व तत्सम कामासाठी आरोपीच्या घरी गेलो होतो. मात्र आरोपी मिळून आलेले नाही. तर या बाबत पोलीस निरीक्षक व्यंकटराव आंधळे यांनी सांगितले की, सदरचा तपास हा पोलीस हवालदार कोर यांच्याकडे असून गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद केला आहे. यातील सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश हवालदार कोर यांना दिलेले आहेत. संबधित फिर्यादी मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
एका दादल्याचे दोघींशी लग्न ?
By admin | Published: October 13, 2016 8:30 PM