दीप्ती देशमुख, मुंबईमुलाकडून देखभालीचा खर्च मागताना विवाहित मुलगीही आर्थिकरित्या तेवढीच सक्षम असल्यास विवाहित मुलीनेही पालकांचा साभांळ करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने पालकांना याचिकेत विवाहित मुलीला प्रतिवादी करण्याचे निर्देश देताना म्हटले.आनंद जाधव (बदल्लले नाव) यांनी त्यांचा मोठा मुलगा गोविंद जाधव (बदलले नाव) याच्याकडून देखभालीचा खर्च मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र गोविंद याने त्याच्यापेक्षाही त्याची विवाहित बहीण आणि धाकट्या भावाला जास्त उत्पन्न असल्याने पालकांनी त्यांच्याकडूनही देखभालीचा खर्च मागावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली.आनंद जाधव यांच्या वकिलांनी गोविंद यांचे म्हणणे फेटाळले. ‘विवाहित मुलगी पतीच्या घरच्यांना सांभाळण्यासाठी बांधील असते. पालकांना सांभाळण्यासाठी नाही,’ असा युक्तिवाद जाधव यांच्या वकिलांनी केला. मात्र उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. ‘या केसमध्ये, विवाहित मुलगी अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असून तिचे उत्पन्न चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ती तिच्या पालकांचा सांभाळ करणे आवश्यक आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. ‘या केसमध्ये असे दिसून येते की, विवाहित बहीण आणि धाकटा भाऊ गलेलठ्ठ पगार घेऊनही त्यांना यामध्ये प्रतिवादी करण्यात आले नाही. पालकांचे केवळ मोठ्या मुलाशी आणि सुनेशी वाद असल्याने त्यांच्याकडूनच देखभालीचा खर्च मागण्यात आला आहे,’ असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
‘विवाहित मुलीने पालकांचा सांभाळ करणे आवश्यक’
By admin | Published: March 04, 2016 3:08 AM