प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या तरुणीशी पुण्यातील तरुण जुलै २०१४ मध्ये विवाहबद्ध झाला. तिच्या वडिलांकडून हुंडा घेऊन तो तिला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईला फिरायला नेतो, असे कारण देऊन तिला मुंबईत घेऊन आला आणि तिला तेथेच सोडून फरार झाला. तो परत कधी फिरकलाच नाही. ती आली तेव्हा नववधूच्या वेशात असल्याचे रुग्णालयाने सांगितले. तिच्या शरीरावर कोड असल्याने तिला नाकारणाऱ्या कुटुंबीयांनी अखेर दोन वर्षांनी तिला प्रादेशिक मनोरुग्णालयातून घरी नेले. मुंबईला भरकटत असताना देवनार पोलिसांनी ३२ वर्षीय विवाहित महिलेला ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला तिला विचारले असता, ‘मै घुमने आयी थी, गुम गयी’ असेच ती सांगत असे. तिच्याशी संवाद साधून मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा केसरकर यांनी तिचा पत्ता शोधून काढला. ती उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्याच्या लक्ष्मीपूर गावातील असल्याचे आढळून आले. या पत्त्यावरून तिच्या कुटुंबीयांचा शोध त्यांनी सुरू केला. या वेळी तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांना संपर्क केला असता तिच्या कुटुंबीयांची माहिती सहजगत्या मिळाली. केसरकर यांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधून तुमची मुलगी प्रादेशिक मनोरुग्णालयात असल्याची माहिती दिली. त्या वेळी तिला नेण्यास तिच्या कुटुंबीयांनी असमर्थता दाखवली. ज्याज्या वेळी प्रादेशिक मनोरुग्णालय तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यात्या वेळी ते तिला घरी घेऊन जाण्यासंदर्भात टाळाटाळ करीत असे. एकदा फोनवर तिच्या भावोजींनी सांगितले की, तिच्या शरीरावर कोड आहे आणि आमच्या गावात शरीरावर कोड असलेली महिला समोर आली, तर तिला अपशकुनी समजले जाते. परंतु, केसरकर यांनी तिच्या वडिलांचे आणि इतर नातेवाइकांचे वारंवार फोन करून समुपदेशन केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला २०१४ मध्ये दोन महिन्यांपासून मानसिक आजार झाला होता. तिला औषधोपचार केल्यावर ती बरी झाली. शेजारच्या गावात एक पुण्याहून मुलगा आला होता. त्याने तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला. या वेळी तिच्या वडिलांनी लग्नाचा सर्व खर्च करून त्या मुलाला रोख रक्कम देऊ केली. लग्न झाल्यावर तो मुलगा तिला मुंबईला फिरायला नेतो. नंतर, आम्ही पुण्यात येऊ, असे सांगून तिला घेऊन गेला. यानंतर, तिला मुंबईतच सोडून फरार झाला. तिच्या वडिलांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा फोन बंद येत होता.>समुपदेशनानंतर बदलसमुपदेशनानंतर अखेर तिचे वडील मदरसाचे काझी यांच्यासमवेत येऊन तिला काही दिवसांपूर्वी घरी घेऊन गेले. या रुग्णावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. ऋचा जोशी यांनी उपचार केले. या वेळी वरिष्ठ मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा वाठोरे यांचे मार्गदर्शन लाभले.