पुणे : डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या एका विवाहितेने वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना वारजे येथे घडली. विवाहितेच्या मोबाइलवर तिच्या वरिष्ठाने अश्लील मेसेज पाठविले असून, तो मोबाइल पतीने पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. गेल्याच महिन्यात तिने आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने नोकरी सोडणार असल्याचे पतीला सांगितले होते. तब्बल एक महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले असून, वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अश्विनी महेंद्र पाटील (वय ३२, रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सूरज बुंदेले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेंद्र अशोक पाटील (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी या डीएचएफएल कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजर पदावर होत्या. आरोपी बुंदेले हा अश्विनी यांचा कंपनीतील वरिष्ठ आहे. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महेंद्र कामावरून घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्या वेळी बेडरूममध्ये अश्विनी यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. महेंद्र यांनी शेजाऱ्यांना बोलावत मृतदेह खाली उतरवला. दरम्यान, पोलिसांना संपर्क करण्यात आला. त्या वेळी बेडवरच पडलेला अश्विनी यांचा मोबाइल वाजत होता. या मोबाइलवर सूरज बुंदेले याचा फोन होता. हा फोन उचलत महेंद्र यांनी ‘माझी अश्विनी गेली’ असे सांगून फोन बंद केला. पत्नीचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये बुंदेलेने अश्विनी यांना वारंवार फोन करून त्रास दिल्याचे दिसले. शिवीगाळ करीत ‘मी पार्किंगमध्ये उभा आहे, दार उघड’ असे मेसेज वारंवार पाठवल्याचेही त्यांनी पाहिले.अश्विनी यांनी आपण स्वखुशीने फाशी घेत असल्याचे लिहून ठेवलेली चिठ्ठीही तेथे मिळाली. पाटील यांनी बुधवारी रात्री वारजे पोलिसांकडे जाऊन फिर्याद दाखल केली. आरोपीचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By admin | Published: October 07, 2016 6:01 AM