सिंदखेडराजा: द्रास,टायगर हिल भागात कर्तव्यावर असलेले तालुक्यातील पळसखेड चक्का येथील हुतात्मा जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या पार्थिवावर २० डिसेंबर रोजी पळसखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैनिक आणि पोलिस दलाच्या वतीने यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेटेनन्सचे काम करीत असताना हिम वादळादरम्यान हिमकडा अंगावर कोसळून जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे हुतात्मा झाले होते. १५ डिसेंबर रोजी ही दुर्देवी घटना घडली होती. लेह, दिल्ली, मुंबई हवाईमार्गे अैारंगाबाद येथे १९ डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांचे पार्थिव आणण्यात आले होते. तेथ विमानतळावर लष्कराकडून त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली होती. त्यानंतर २० डिसेंबरला सकाळी त्यांचे पार्थिव अैारंगाबाद येथून पळसखेड चक्का या त्यांच्या मुळ गावी आणण्यात आले. पार्थिव काही काळ घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव आणण्यात आले. औरंगाबाद येथून सैनिक वाहनात हुतात्मा प्रदीप मांदळे यांचा मृतदेह सिंदखेड राजाकडे मार्गस्थ झाल्या नंतर रस्त्याच्या दुतर्फा वीर जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान अमर रहे !! या घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी फुलांचा वर्षा केला. पळसखेड येथे मांदळे यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांना हुंदके आवरता आले नाही. अर्धातास घरचे सोपस्कार झाल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, सिंदखेड राजाचे माजी नगराध्यक्ष ॲड. नाझेर काझी, काजी, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, एसडीअेा सुभाष दळवी, तहसिलदार सुनील सावंत, माजी सैनिक कल्याण अधिकारी फिरदौस, नगराध्यक्ष सतिष तायडे, माधवराव जाधव, यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहली.
चिमुकल्या जयदेव ने दिला भडाग्नी
हुतात्मा प्रदीप मांदळे यांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत आक्रोशीत होती. आई, पत्नी कांचन यांच्यासह तीन चिमुकली मुलं, त्यांचा आक्रोश पाहून लाखोंची गर्दी स्तब्ध होती. सैनिक मानवंदेपूर्वी कुटुंबीयांना अंत्यदर्शन देण्यात आले तर चिमुकल्या जयदेव याने वडीलाच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. प्रारंभी बुध्द धम्माच्या पद्धतीने भंते यांनी प्रार्थना करून अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.
सिंदखेडराजा येथे तोबा गर्दी
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे पार्थिव येणार असल्याने नागरिकांनी हुतात्मा जवानाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. दुतर्फा दोन किलोमीटर रांग लावून नागरिकांनी जोरदार घोषणा दिल्या. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी शहराच्या वतीने वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.