मुंबई : मुंबईच्या १२वर्षीय मरियम सिद्दिकी या मुस्लीम विद्यार्थिनीने इस्कॉनतर्फे आयोजित ‘गीता चॅम्पियन्स लीग’ स्पर्धेत बाजी मारली. मीरा रोड येथील सहावीत शिकणाऱ्या मरियमने १९५ शाळांच्या सुमारे साडेतीन हजारांहून अधिक स्पर्धकांना मागे टाकत भगवद्गीतेवरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. या स्पर्धेत भगवद्गीतेविषयीचे ज्ञान तसेच भगवद्गीतेचे आकलन तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली. यात गीतेवर आधारित १०० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. याबाबत बोलताना मरियम म्हणाली की, ‘माझ्या शिक्षकांनी मला गीता स्पर्धा असल्याबाबत सांगितले. तू सहभाग घेऊ शकतेस असेही सांगितले. याबाबत मी माझ्या पालकांना विचारल्यावर कोणताही धर्म असो, तू त्यात भाग घेऊ शकतेस असे त्यांनी सांगितले. मला खरोखरच गीता आवडते. त्यामध्ये कृष्णाने अर्जुनाला कशा प्रकारे जगावे, प्रत्येकाशी कसे बोलावे, सर्वांचा कसा आदर करावा अशा गोष्टी आहेत. मला या साऱ्या गोष्टी आवडतात.’ (प्रतिनिधी)
भगवद्गीता स्पर्धेत मरियमची बाजी
By admin | Published: April 04, 2015 4:48 AM