पुणे/मुंबई : ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशात मास्क सक्ती असा शब्द वापरला. तो सक्तीचा असा होत नाही. ते आवाहन आहे, असे समजावे. न वापरल्यास कोणताही दंड लागणार नाही,’ असे स्पष्ट करत १५ दिवसात संख्या लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या हजारच्या वर नोंदवण्यात आली. शनिवारी दिवसभरात १३५७ नवे रुग्ण आढळले. टास्क फोर्सच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर अतिरिक्त मुख्य सचिवांनी याबाबतचे आदेश काढले. त्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे आहे, असा उल्लेख होता. त्यावर टोपे यांनी स्पष्टीकरण दिले.
मानकापेक्षा कमी चाचण्याजागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा राज्यांत २६ जिल्ह्यांमध्ये चाचण्या कमी होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्या वाढविण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात ९८० चाचण्या करणे आवश्यक असल्याचे मानक आहे.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा- मुंबई, पुणे, पालघर, ठाणे व रायगडसह काही भागात रुग्ण वाढत आहेत. हे लक्षात घेऊन केंद्राने राज्याला पत्र पाठविले. त्यात संख्या वाढू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. - गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करावे. मात्र, ते वापरावेच अशी सक्ती नाही. बस, रेल्वे, शाळा, कार्यालये अशा गर्दीच्या ठिकाणी पुढील किमान १५ दिवस तरी मास्क वापरावे. - मोकळ्या ठिकाणी वापरले नाही तरी चालेल, असे बैठकीत सुचविण्यात आले. आणखी १५ ते २० दिवसांनी संख्या लक्षात घेऊन सक्ती करायची किंवा नाही याबाबत निर्णय घेऊ.
राज्यात दिवसभरात १,३५७ बाधितकोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे चिंता वाढली असताना, राज्यात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या हजारच्या वर नोंदवण्यात आली. शनिवारी दिवसभरात १ हजार ३५७ बाधित रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.
देशात ३९६२ नवे रुग्णदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९६२ नवे रुग्ण आढळले. आणखी २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये १२३९ जणांची भर पडून ती एकूण संख्या २२४१६ झाली. रुग्णांचा एकूण आकडा ४ कोटी ३१ लाख ७२ हजार ५४७वर पोहोचला. त्यातील ४ कोटी २६ लाख २५ हजार ४५४ जण बरे झाले.
कोर्बेवॅक्सला बूस्टर डोस म्हणून मान्यता१८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांना आता कोर्बेवॅक्स ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. तसा आपत्कालीन वापर करण्याची मंजुरी या लसीला केंद्र सरकारने दिली आहे. कोरोना लसीचे दोन डेस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी कोर्बेवॅक्सचा बूस्टर डोस घेता येणार आहे.