बुलढाणा: समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी खासगी प्रवाशी बसला झालेल्या अपघातामधील २४ मृतकांच्या पार्थिवावर स्थानिक संगम तलावस्थित स्मशानभूमीत सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नागपूर येथील झोया शेख यांचे पार्थिव बुलढाण्यातीलच कब्रस्थानमध्ये दफन करण्यात आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पार्थिवांना अग्नी दिला.
या सामुहिक अंत्यसंस्कार प्रसंगी खा. प्रतापराव जाधव, खा. रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जि. प. सिईअेा भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने प्रामुख्याने उपस्थित होते.
मृकांची अेाळख पटविणे अवघड असल्याने तथा दीर्घकाळ ते शित शवपेटीतही ठेवता येण्यासारखे नसल्याने मृतकांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करत तथा त्यांची सहमती घेत सामुहिक अंत्यसंस्कर करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत नातेवाईकांसह बुलढाणेकरांनी मोठी गर्दी केली होती. दोन मिनीट शांत राहून यावेळी मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले.
२० चितांवर २४ पार्थिवांचे दहनबुलढाणा पालिकेच्यावतीने संगम तलाव स्थित स्मशानभूमिमध्ये साडेसात क्विंटल लाकूड, अडीच हजार गोवऱ्यांसह धार्मिक विधीसह २४ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये तेजस पोकळे (वर्धा), करण बुधबावरे (वर्धा), वृषाली वनकर (पुणे), शोभा वनकर (पुणे), ओवी वनकर (पुणे), ईशान गुप्ता (नागपूर), सुजल सोनवणे (यवतमाळ), तनिषा प्रशांत तायडे (वर्धा), तेजस्विनी राऊत (वर्धा), कैलास गंगावणे (पुणे), कांचन गंगावणे (पुणे), सई गंगावणे (पुणे), संजीवनी शंकरराव गोटे (वर्धा), सुशील खेलकर (वर्धा), रिया सोमकुवर (नागपूर), कौस्तुभ काळे (नागपूर), राजश्री गांडोळे (वर्धा), मनीषा बहाळे (वाशिम), संजय बहाळे (वाशिम), राधिका महेश खडसे (वर्धा), श्रेया विवेक वंजारी (वर्धा), प्रथमेश प्रशांत खोडे (वर्धा), अवंती परिमल पोहणेकर (वर्धा), निखिल पाते (यवतमाळ) यांच्या पार्थिवांचा समावेश होता.