ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.31 - बाहेरगावाहून सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करीत तिला बळजबरीने दारु पाजून दोघाजणांनी बलात्कार करण्यात आल्याची घटना धनकवडीमधील संत शंकर महाराज वसाहतीजवळील ज्ञानेश्वर सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सहकारनगर पोलिसांना जेव्हा पिडीत महिलेने बुधवारी सकाळी ही घटना सांगितली, तेव्हा तातडीने सुत्र हलवीत अवघ्या चार तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पिडीत महिलेवर उपचार सुरु आहेत.
नवनाथ राम जाधव (वय 20, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी), खंडू बापू लोंढे (वय 32, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी लोंढे हा महापालिकेमध्ये मुकादम आहे. पिडीत महिला केटरींगमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करते. तिचे लग्न झालेले असून तिला तीन मुली आहेत. ही महिला रविवारी कामानिमित्त नगर जिल्ह्यातील नेवासे येथे गेली होती. मंगळवारी रात्री ही महिला बसने रात्री अकराच्या सुमारास शिवाजीनगरला उतरली. आॅटोरिक्षाने ती सातारा रस्त्यावर आली. ज्ञानेश्वर सोसायटीजवळून ही महिला पायी चालत जात होती. त्यावेळी आरोपी लोंढे आणि जाधव सोसायटीच्या पार्किंगमध्ये दारु पित बसलेले होते.
या महिलेला पाहिल्यावर आरोपींनी काही कळायच्या आतच तिच्या कपाळावर कठीण वस्तुने प्रहार केला. या महिलेला धरुन आरोपींनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेले.
तिला खाली पाडत जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार सुरु असताना ही महिला आरोपींकडे विनवनी करुन आपल्याला तीन मुली असून मला सोडा अशी वारंवार विनंती करीत होती. मात्र, आरोपींना तिची दया आली नाही. त्यांच्या तावडीमधून कशीबशी सुटका करुन घेतलेल्या या महिलेने सोसायटीमध्ये जाऊन घरांचे दरवाजे वाजवले. मात्र, सुरुवातीला तिच्या मदतीला कोणीही आले नाही. काही वेळाने मोजके रहीवासी आले. त्यांनी पार्किंगमध्ये जाऊन पाहिले असता आरोपी पसार झालेले होते.
रात्री ही महिला घरी गेली. बुधवारी सकाळी आईला घेऊ न भेदरलेली ही महिला सहकारनगर पोलीस ठाण्यात पोचली. वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेत आरोपींच्या मागावर पोलीस पथक रवाना केले. दरम्यान, आरोपींचा माग काढत असताना एका खब-याने हा गुन्हा लोंढेने केल्याची माहिती दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, जाधव यालाही पोलिसांनी जेरबंद केले. तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. थोरात हे करत आहेत.
आरोपींपैकी अटक करण्यात आलेला खंडू लोंढे हा महापालिकेमध्ये मुकादम आहे. तर आरोपी नवनाथ जाधव याची आई महापालिकेमध्ये नोकरीस आहे.
पिडीत महिलेचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असून तिला तीन मुली आहेत. तिच्या पतीचे काही वर्षांपुर्वी काविळीने निधन झालेले आहे. सध्या ही महिला सासुसास-यासह राहण्यास आहे.