मुंबई : शहरातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने झाडे तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र चेंबूरमध्ये एका खासगी विकासकाने बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या शेकडो झाडांची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेकडे तक्रार देऊनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराचा विकास मोठ्या झपाट्याने वाढला. शहरात सध्या अनेक बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. मात्र काही वेळा इमारतींचे बांधकाम करण्यासाठी काही झाडे अडथळा ठरतात. अशावेळी विकासक झाडांवर काही रासायनिक प्रक्रिया करून या झाडांना ठार मारतात. संपूर्ण मुंबई शहरात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र पालिका अधिकाऱ्यांचे या विकासकांसोबत साटेलोटे असल्याने कारवाई न करताच झाडाला रोग लागल्याचे कारण समोर ठेवले जाते. अशाच प्रकारे सध्या चेंबूरमधील शेल कॉलनी परिसरात एका नामवंत विकासकाकडून १५ ते २० टॉवरचा प्रोजेक्ट सुरू आहे. परिसरातील २० ते २५ जुन्या इमारती तोडून हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. विकासकाने या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच अनेक झाडे तोडून पहिल्यादा ही जागा मोकळी केली. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून मोठ्या जोमाने हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आला. मात्र दीड महिन्यापूर्वी या प्रकल्पाच्या आजूबाजूला असलेली शेकडो झाडे अचानक सुकू लागली.
चेंबूरमध्ये शेकडो झाडांची कत्तल
By admin | Published: March 16, 2015 3:36 AM