ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - पुढच्या ४८ तासात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत रहातील असे हवामान खात्याने म्हटले आहे. कालपासून म्हणजे २१ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढला आहे.
पुढच्या २४ ते ४८ तासात हा पावसाचा जोर आणखी वाढेल असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव राजीव निवातकर यांनी सांगतिले. २३ सप्टेंबरला म्हणजे उद्या सकाळी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आज मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. रस्ते आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई जवळच्या अरबी समुद्रात वादळाची स्थिती तयार होत असल्याने मुंबई आणि शेजारच्या ठाणे, पालघरमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे असे निवातकर यांनी सांगितले.