मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहभाग घेतला. या अभियानात सचिनने मुलगा अर्जुन तेंडुलकरसह या अभियानात सहभाग घेतला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुलगा अर्जुन तेंडुलकर तसंच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज पहाटे पाच वाजता हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन सचिन तेंडुलकरने यावेळी केलं.
भारताला आपण माता म्हणतो, मग आपला देश अस्वच्छ कसा ठेवू शकतो? असं सांगत सर्वांनीच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेण्याचं आवाहनही सचिनने केलं. चौपाटीवर एवढी घाण आहे. यावर विश्वासच बसत नाही. चौपाटीवर प्रत्येक ठिकाणी कचरा दिसत आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे फक्त देशच स्वच्छ होणार नाही. तर देश आरोग्यदायी होईल, असं सचिननं सांगितलं. आपल्या घरात कोणी कचरा टाकत नाही. आपण घराच्या बाहेर कचरा टाकतो. त्यामुळे आपण कचरा पेटीतच कचरा टाकावा. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कचरावाले कचरा साफ करतात असं आपण म्हणतो. पण तो कचरावाला नसतो तर तो सफाईवाला असतो. आपणच कचरावाले आहोत, असंही सचिननं यावेळी बोलताना सांगितलं. तर लोकांनी कुठेही कचरा फेकू नये. आपलं शहर, आपली भूमी आपणच स्वच्छ ठेवायला हवी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मोदींनी आपल्या वाढदिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. इतकंच नाही तर मोदींनी देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पत्र लिहून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सचिन तेंडुलकरने आज या अभियानात हजेरी लावली. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीदेखील ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आज सकाळी सचिनने वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात साफसफाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.
'स्वच्छता ही सेवा' अभियानासाठी मोदींचं अजिंक्य रहाणेला पत्रनरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या या अभिनायासाठी अजिंक्य रहाणेला पत्र लिहिलं होतं. या पत्रात मोदींनी रहाणेला ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं. अजिंक्य रहाणेने पंतप्रधान मोदींच्या पत्राचा फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्याचं उत्तर देताना रहाणेने लिहिलं की, “आदरणीय नरेंद्र मोदी जी, तुमचं पत्र मिळाल्याने मी फारच आनंद आहे. ‘स्वच्छता ही सेवा’अभियानात सहभागी होणं ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे, असं म्हंटलं होतं. संपूर्ण देशात सफाई आणि स्वच्छता करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने हे अभियान सुरु केलं आहे. पंतप्रधानांनी रहाणेला 15 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या स्वच्छता अभियानात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. या अभियानात देशातील नागरिकांनी सहभागी व्हायला हवं, असंही म्हटलं. कॅप्टन कोहलीनेही केली होती साफसफाईभारतीय क्रिकेटपटूंनी याआधीही सामाजिक कल्याणाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली मागील वर्षी गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी झाला. त्यावेळी कोहलीने ईडन गार्डनवरील सफाई अभियानात सहभाग घेतला होता. ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांच्या माध्यमातून देशातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण व्हावी, याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो आहे.