ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - 'उरी' येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत- पाकिस्तानदरम्यानचे वातावरण तापलेले असून पाकिस्तानी कलाकारा, खेळाडू, गायक यांना भारतातून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. मनसे, शिवसेना या पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून त्यांना मायदेशात परत पाठवण्याची आग्रही भूमिका घेतल्यानंतर फवाद खान व इतर मंडळी पाकिस्तानात परतली आहे. याचा फटका बॉलिवूडलाही बसला असून करण जोहरच्या ' ऐ दिल है मुश्किल' या आगामी चित्रपटात फवाद खानची भूमिका असल्याने तो चित्रपट अडचणीत सापडला आहे. तर बॉलिवूडचा बादशाह साहरूख खान याच्या बहुचर्चित ' रईस' या चित्रपटातही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान झळकणार असल्याने त्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता दिसत आहे. हे लक्षात घेऊनच या चित्रपटातून माहिराचा पत्ता कट करण्यात आल्याचे वृत्त आहे. ' डीएनए' या वृत्तपत्रानुसार, माहिराला या चित्रपटातून काढण्यात आले असून तिच्याऐवजी या भूमिकेसाठी दुस-या अभिनेत्रीचा शोध सुरू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ' (माहिराला काढण्याचा) हा निर्णय निर्माता रितेश सिधवानीसाठी खूप त्रासदायक होता. माहिराऐवजी दुस-या अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यात यावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दबाव टाकण्यात येत असून ' उरी' येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तर त्याची तीव्रता आणखीनच वाढली. त्यामुळे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत शूटिंग करणे अतिशय कठीण झाले. या समस्येवर विविध उपाय सुचवले गेले, मात्र कोणताही मार्ग न दिसल्याने अखेर माहिराचा पत्ता कट झाला असून दुस-या अभिनेत्रीचा शोध सुरू झाला आहे.