विशेष प्रतिनिधी मुंबई : एरवी राजकीय आखाड्यात एकमेकांवर तुटून पडणारे विविध पक्षांचे आमदार आज चक्क मैदानात उतरले आणि त्यांनी फुटबॉल मॅचच्या आनंद लुटला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुमासदार शैलीतील कॉमेन्ट्रीने रंगत आणली.१७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार असून, त्यादृष्टीने वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून आज विधान भवनासमोरील प्रांगणात अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हनमधील फुटबॉलचा सामना अध्यक्ष इलेव्हनने ४-२ असा जिंकला. फुुटबॉलपटूंच्या वेशात उतरलेल्या आमदारांच्या या मॅचचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावते समालोचन केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचा शुभारंभ केला. सामना सुरू होताच दोन्ही संघांत दहा ते अकराखेळाडू असल्यामुळे मैदानच अपुरे पडू लागले. फुटबॉल कमी आणि कुस्तीच जास्त... अशी परिस्थिती आल्याने विनोद तावडे यांनी मॅचरेफ्रीची भूमिका वठवत दोन्हीकडे सात-सात खेळाडू खेळविण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे आमदार नरेंद्र पाटील व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात हमरीतुमरी झाली. मात्र, आशिष शेलार यांनी मध्यस्थी करत खेळीमेळीच्या वातावरणात यावर पडदा टाकला.या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व मंत्री व सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विधान भवनाच्या बाहेर खास फुटबॉलसाठी मॅटचे मैदान बनविण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांचे चिमटे अन् टोलेबाजीसामना सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या खुमासदार शैलीतील समालोचनातील टोलेबाजीने खेळात रंगत आणली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये पेनल्टी किकवरून भांडण रंगले असता मुख्यमंत्र्यांनी आता कुस्तीचा सामना सुरू होईल, अशी शंकावजा टिप्पणी करताच हशा पिकला.त्यातच क्रीडा मंत्री विनोद तावडे मध्यस्थीसाठी आले असता, ‘आता तावडे क्रीडामंत्री सगळेच प्रश्न सोडवतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. तर रंगलेले भांडण आपण अध्यक्षांच्या दालनात सोडवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. खेळाडू पायाने कमी आणि पोटानेच जास्त खेळत आहेत, प्रकाश मेहतांची किक होती, पण त्यांचा नेम चुकला... अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. विजयी खेळाडूंना ५० हजारांचे बक्षीस आणि चॉकलेट मंदा म्हात्रे यांच्याकडून देण्यात येईल, अशी हास्याची पेरणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
विधान भवनासमोर रंगली फुटबॉल मॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:25 AM