परभणी : गेल्या वर्षीचा दुष्काळ यावर्षीही कायम आहे. त्यात गारपीटीचेही संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. मात्र शिवसेना पूर्ण शक्तिनिशी आपल्यासोबत आहे. तेव्हा दुष्काळाचा नेटाने सामना करा, आत्महत्या करून आपल्या कुटुंबियांना आणखी संकटात टाकू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत रविवारी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ३३३ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी सुमारे एक लाख वऱ्हाडी परभणीत दाखल झाली होती. या प्रसंगी उपस्थितांशी उद्धव यांनी संवाद साधला.दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न व्हावीत म्हणून हा सोहळा घेतला आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. निवडणुकीच्या वेळी तुम्ही दिलेली सर्व ताकद शिवसेना तुम्हालाच समर्पित करीत आहे. केवळ निवडणुकीपुरते आणि मतदानापुरते राजकारण ही परंपरा शिवसेनेने मोडीत काढल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दुष्काळाचा नेटाने सामना करा
By admin | Published: February 29, 2016 4:31 AM