शिर्डी - क्रिकेटप्रमाणे संसदेत विधेयक मंजूर करणे, प्रश्न विचारणे, आवाजी मतदान, सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यासाठी फिक्सिंग चालते, असा आरोप भाजपाशी काडीमोड घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केला़ शिर्डीत शनिवारी देशव्यापी ओबीसी जनगणना परिषद सुरू झाली. दोन दिवसांच्या परिषदेसाठी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर कुमार, आयोजक माजी खा. हरिसिंग राठोड, प्रदेशाध्यक्ष डॉ़ ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, राष्ट्रीय ओबीसी जनगणना परिषदेचे अध्यक्ष प्रा़ श्रावण देवरे, दशरथ कुळधरण आदींसह २२ राज्यांचे प्रतिनिधी आले आहेत.पटोले म्हणाले, सत्ता मिळविण्यासाठी ओबीसींचा वापर केला जातो़ नंतर दुर्लक्ष करण्यात येते. मोदींना पंतप्रधान करण्याची सर्व अक्कल नागपूरची आहे़ त्यांना बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाचे व चहावाला सांगून गरिबांचे प्रतिनिधी म्हणून पुढे करण्यात आले़ नागपूरच्या थिंक टँकपुढे बहुजन समाज फसला व निर्विवाद बहुमत दिले़ नागपुरातील अल्पसंख्याक लोक बुद्धीच्या जिवावर सत्ता मिळवू शकतात, तर आपण बहुसंख्येने असूनही सत्ता का मिळवू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. परिषदेला आलेल्या प्रतिनिधींनी नागपूरप्रमाणे थिंक टँक निर्माण करून सत्तेचा सोपान चढावा, असे आवाहनही त्यांनी केले़ मोदींना उलट उत्तर देणारा चालत नाही़ जनतेला मंत्र्यांची नावेसुद्धा माहिती नाहीत़ प्रत्येकाच्या खिशातून अर्धा टक्का पैसा स्वच्छतेसाठी घेतला जातो़ जीएसटीच्या माध्यमातूनही सामान्यांच्या खिशातून पैसा काढला जातो. सरकारी शाळा बंद करून बहुजनांना संपवण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. चौथ्या स्तंभालाही काम करण्यापासून रोखले जात आहे, असे त्यांनी सांगितले.रावणासारखा गर्व करू नयेमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करण्याचे टाळत पटोले यांनी रावणाचे उदाहरण दिले. रावणासारखा कुणीही गर्व करू नये, असे ते म्हणाले. भाजपाचे नेते एकनाथ खडसे, राज्यातील ज्येष्ठ नेते नारायण राणे या बहुजन समाजातील नेत्यांना संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ छगन भुजबळ केवळ बहुजन समाजातील नेते आहेत म्हणून आत आहेत़ डाकू लोकांचे काय केले, असे ते म्हणाले.
संसदेतही क्रिकेटप्रमाणे मॅच फिक्सिंग -नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 4:34 AM