ठाणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आता रंगतदार स्थितीत आला आहे. बविआची एकगठ्ठा मते राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याने एकेका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. ५३१ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या स्वत:ची सुमारे २९४ मते आहेत. उर्वरित जमवाजमव करून त्यांनी ४३९पर्यंत मजल मारली आहे. ठाण्यातील सेनेच्या बड्या नेत्याच्या कार्यालयात आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. एकूण १०२६ मतदार हक्क बजावणार आहेत. बविआची सुमारे ११९ मते राष्ट्रवादीला जाणार असल्याने शिवसेनेपुढील अडचणींत भर पडली आहे. शिवसेनेला ९२ मतांची गरज भासणार आहे. तरीदेखील ही मते आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी शिवसेनेच्या नेतेमंडळींचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.प्रचारासाठी मुख्यमंत्री आज ठाण्यात भाजपानेही मित्रधर्म गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हाच संदेश जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या नगरसेवकांपर्यंत जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ मे रोजी दुपारी ४ वाजता ठाण्यात मेळावा घेणार आहेत. वागळे इस्टेट येथे तो होणार असल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेची ५३१ मतांसाठी जुळवाजुळव
By admin | Published: May 28, 2016 1:32 AM