मुंबई : थोड्याशा पावसाचा फटका बसून मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा रखडल्याने मुंबईकरांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक प्रवासी गाडीत व स्टेशनवर अडकून पडले. मात्र त्यातही मुंबईकरांची मदतीची वृत्ती दिसून आली. रखडलेल्या लोकलमधील माल डब्यात पुरुषांनीच महिलेची प्रसूती केली. दिवा येथे राहणाऱ्या गुडिया प्रमोद गुप्ता (२५) या मंगळवारी सकाळी जे. जे. रुग्णालयात जात होत्या, मात्र त्यांनी भांडुप रेल्वे स्थानकात लोकलमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिला. शेडगाव परिसरात गुडिया राहतात. जे. जे. रुग्णालयात त्यांची नावनोंदणी केली होती. सोमवारी मध्यरात्रीपासून तिच्या पोटात दुखत होते. मंगळवारी त्यांची तारीख असल्याने त्यांनी जे.जे. रुग्णालयात येण्यासाठी दिवा स्थानक गाठले. पावसामुळे सकाळपासूनच विस्कळीत असलेल्या मध्य रेल्वेचा फटका त्यांना बसला. सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी दिवा स्थानक गाठले. स्थानकावरील गर्दी, त्यात गुडिया यांच्या वाढत्या प्रसुती कळांमुळे काय करायचे, असा प्रश्न पतीसमोर उभा ठाकला होता. सकाळपासून खूप वेळ लोकलची वाट पाहात त्या दिवा स्थानकावर उभ्या होत्या. मात्र गर्दीमुळे त्यांना कोणत्याच गाडीत चढता आले नाही. अखेर दिवा येथून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या महिला स्पेशल गाडीत चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र प्रचंड गर्दीमुळे त्यांना महिला डब्यात चढता आले नाही. तसेच काही डब्यांत पुरुषांनी जागा अडवली होती. त्यामुळे त्यांना ती लोकल सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर त्याच्या पाठीमागून आलेल्या माल डब्यात चढवताना गर्दीच्या ओघात पती मागे राहिले. अशात कसेबसे ते मागच्या डब्यात चढले. पती फोनवरून गुडिया यांच्या संपर्कात होते. माल डब्यात जास्त महिलाही नव्हत्या. अशातच लोकल मुलुंड ते भांडुपदरम्यान पोहोचली असताना कळा वाढल्याने तेथील पुरुषांनीच त्यांच्या प्रसूतीसाठी मदत केली व गुडिया गुप्ता यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. (प्रतिनिधी)
लोकलमध्येच झाली प्रसूती
By admin | Published: June 22, 2016 4:04 AM