लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. डॉक्टर्स व अत्यावश्यक सुविधांअभावी एका महिलेने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिल्याची घटना ऐरोलीत घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले आहेत. या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य सेवेच्या पुन्हा एकदा मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु विविध घटनांच्या माध्यमातून प्रशासनाचा हा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐरोली सेक्टर ३ येथे महापालिकेचे राजमाता जिजाऊ रुग्णालय आहे. या रुग्णालयात रबाले, दिघा, घणसोली, गोठीवली व चिंचपाडा परिसरातील महिला व नवजात बालक उपचारासाठी येतात. परंतु या रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. पुरेसे डॉक्टर्स नाहीत. येथे तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची हेळसांड होत आहे. अनेकदा त्यांना वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. निलोफर शाहरूख शेख या महिलेला मंगळवारी प्रसूती वेदना होवू लागल्याने तिला ऐरोलीतील माता-बाल रुग्णालयात आणले. परंतु तिचे प्रसूतीचे दिवस भरले नसल्याचे सांगत तेथील डॉक्टरने तिला घरी पाठवून दिले. मात्र बुधवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिला असह्य वेदना होवू लागल्या. त्यामुळे तिला पुन्हा या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. परंतु तेथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी तिला वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार रुग्णवाहिकेतून वाशी रुग्णालयाकडे जात असताना सकाळी ८.३0 वाजण्याच्या सुमारास रबाळे रेल्वे स्थानकाजवळ रुग्णवाहिकेतच तिने बाळाला जन्म दिला. आई व बाळ दोन्ही सुखरूप असले तरी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.महापालिकेच्या ढिसाळ आरोग्य सेवेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी प्रकट केली आहे. तर शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी यासंदर्भात प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आपल्या कर्तव्यात कसूर करणारे डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, तसेच रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर्स व इतर आवश्यक कर्मचारी वर्गाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी सांगितले.
रुग्णवाहिकेत झाली महिलेची प्रसूती
By admin | Published: May 11, 2017 2:16 AM