नवी मुंबई : एपीएमसीबाहेर मालाची चढ-उतार करण्याची कामे माथाडी कामगारांनाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच माथाडी बोर्डात कर्मचारी भरती केली जाणार असून यात कामगारांच्या मुलांना संधी दिली जाईल. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली असून राजकारणासाठी माथाडी हिताशी तडजोड कधीच केली जाणार नाही, असे मत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. शासनाने भाजीपाला व फळे नियंत्रणमुक्त केल्यामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होवू लागला होता. यामुळे एपीएमसीच्या बाहेरील चढ - उताराची कामेही नोंदीत माथाडी कामगारांना देण्यात यावीत अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी केली होती. या मागणीची दखल घेवून पणन विभागाने ६आॅक्टोबरला अध्यादेश काढला आहे. एपीएमसीतील कामे दिवसेंदिवस कमी होवू लागली आहेत. यामुळे मार्केटबाहेर जाणाऱ्या मालाची चढ- उतार करण्याची व वाराईची कामे कामगारांना देण्यात यावीत असा अध्यादेश काढला असून पणन संचालकांसह सर्व संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. कामगारांना याविषयी माहिती देण्यासाठी कांदा बटाटा मार्केटमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या हितासाठीच मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली आहे. माथाडी कामगारांच्या हिताच्या आड कोणी आले तर आम्ही ते सहन करणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांशी जवळीक केल्यामुळे मी भाजपात जाणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. मी कुठेही असलो तरी माथाडी कामगार हाच केंद्रबिंदू असेल असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्थितीमध्ये कामगारांच्या विश्वासाला तडा जावून दिला जाणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी माथाडी बोर्डातील वस्तुस्थितीचा आढावा घेतला आहे. लवकरच तेथे कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. कामगारांनी त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठीचा अर्ज बोर्डात करावा व त्याची एक प्रत संघटना कार्यालयात जमा करावी. उपलब्ध अर्जांमधून परीक्षा घेवून भरती केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राजकारणासाठी माथाडी हिताशी तडजोड नाही
By admin | Published: October 19, 2016 3:10 AM