मुंबई : पणन विभागाने २५ आॅक्टोबर आणि कामगार विभागाने २८, २९ आॅक्टोबर आणि २० नोव्हेंबरला काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी करत माथाडी कामगारांनी बुधवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीने मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारत आझाद मैदानात धरणे धरले.
मंगळवारी तोडगा न निघाल्याने बुधवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय झाला. आंदोलनाला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा कृती समितीने केला. मंगळवारी नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह काही ठिकाणी काम बंद आंदोलन झाले. सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले.
नवी मुंबई बाजार समितीत बंदमुळे २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बंदमुळे मुंबईकरांचा धान्य व भाजीपाला पुरवठा थांबला असून, डाळी, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.कोल्हापुरात कांदा-बटाटा, गूळ मार्केटमध्ये बंदमुळे तीन कोटींची तर सांगलीत पाच कोटींची उलाढालठप्प झाली. बंदला खान्देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. धुळे जिल्ह्यात चार बाजार समित्यांत व्यवहार बंद होते. जळगाव, बोदवड बाजार समितीही बंद होती.