मुंबई : मातंग समाजाचे दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांच्या स्मारकासाठी आक्रमक झालेल्या मातंग समाजाने मंगळवारी अखिल भारतीय मातंग संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. या वेळी संघटनेने राज्य सरकारला स्मारकासाठी मुंबईतील तीन जागा सुचविल्या आहेत. त्यात चेंबूर येथील मोटार ट्रेनिंग स्कूल, सुमन नगर आणि भायखळ्यातील राणीबागचा समावेश आहे.मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संघटनेच्या अध्यक्षा कुसुमताई गोपले यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, बाबासाहेबांचे स्मारक चेंबूर किंवा भायखळ्यात उभारावे, अशी मातंग समाजाची भावना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी संघटनेने सुचविलेल्या जागांपैकी एका जागेची निवड करण्याचे आवाहन करत आहे. शिवाय आचारसंहिता संपताच संबंधित जागेची घोषणा करून स्मारकाचे भूमिपूजन करावे.मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणी संघटनेने या वेळी केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला २ हजार कोटी भाग-भांडवल देण्याचे आवाहन संघटनेने सरकारला केले आहे. (प्रतिनिधी)
गोपले यांच्या स्मारकासाठी मातंग समाज आक्रमक
By admin | Published: January 25, 2017 3:52 AM