विजय मांडे, कर्जतशतकापासून धावणारी आणि पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी म्हणजे नेरळ- माथेरान मिनीट्रेनचा प्रवास महागला आहे. गेल्या तीन वर्षांत रेल्वेने केलेली ही दुसरी भाडेवाढ आहे. मिनीट्रेनची तिकिटे गतवर्षीपासून केवळ तिकिट खिडकीवरच मिळत असूनही प्रवाशी-पर्यटकांकडून आरक्षणाचे दर आकारले जात आहेत. प्रवाशांच्या खिशातून पैसे काढण्यासाठी अनोख्या पध्दतीचा अवलंब करून रेल्वेकडून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. याविरोधात रेल्वे संघटनेने दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. दरवाढ करताना रेल्वे प्रशसनाने कोणतीही सूचना प्रवाशांना दिली नाही. त्यामुळे ही दरवाढ नेरळ माथेरान मिनीट्रेनच्या पर्यटकांसाठी अन्यायकरक ठरत असल्याचे नेरल रेल्वे प्रवाशी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. दीड वर्षापूर्वी मध्य रेल्वे प्रशसनाने मिनीट्रेनचे तिकिट दुपटीने वाढविले होते. त्यानंतर पुन्हा ही दरवाढ करण्यात आली आहे. गतवर्षी अनेकदा इंजिन बंद पडल्यामुळे मिनीट्रेनची सेवा रद्द करावी लागली होती. यातून होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी संगणकीय आरक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे सर्व तिकिटे ही मिनीट्रेनचा प्रवास सुरू होण्यापूर्वी एक तास नेरळ आणि माथेरान स्थानकात तिकिट खिडकीवरच उपलब्ध असतात. त्यामुळे रांग लावून उभे असणाऱ्यांनाच तिकिटे मिळतात.नेरळ प्रवासी संघटनेने याविरोधात आवाज उठाविला आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देऊन भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
माथेरानच्या राणीची तीन वर्षांत दुस-यांदा भाववाढ; प्रवासी नाराज
By admin | Published: October 23, 2014 4:01 AM