मुंबई : माथेरान मिनी ट्रेन मे महिन्यापासून बंद ठेवण्यात आली आहे. ही ट्रेन सुरू होण्याबाबत अजूनही अनिश्चितता असून, याबाबत रेल्वेकडून ठोस निर्णय होताना दिसत नाही. ही ट्रेन कधी सुरू होणार हे सांगणे कठीण असल्याचे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले. ट्रेन सुरू करण्याअगोदर सुरक्षेचे सर्व उपाय करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.माथेरानची मिनी ट्रेन रुळावरून घसरण्याच्या सलग दोन घटना २0१६ मधील एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एक स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालातून मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेचे उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. समितीने सादर केलेल्या अहवालात एअर ब्रेक बसवितानाच घाट सेक्शनमध्ये ६५0 मीटरची भिंतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला. यानंतर रेल्वेकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. उलट मिनी ट्रेनचे इंजिन अद्ययावत करण्यासाठी दार्जिलिंगला पाठविण्यात आले. या सर्व गोंधळात मिनी ट्रेन सुरू होण्यावर ठोस निर्णय झालाच नाही. रेल्वेकडून मध्यंतरी मिनी ट्रेन बंद केली जाणार नाही, असे स्पष्टही करण्यात आले. परंतु अद्यापही याबाबत हालचाली होताना दिसत नाहीत. यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले की, ट्रेन सुरू होण्यापूर्वी सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनच्या डब्यांत बदल करणे तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन आहे. यातील संरक्षक भिंतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ट्रेन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे; पण कधी सुरू होईल हे सांगता येणे कठीण असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
माथेरान ट्रेनबाबत अनिश्चितता
By admin | Published: October 15, 2016 4:36 AM