सिंदखेडराजा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या ४१९ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी मातृतीर्थ गजबजले होते. पौष पौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी अनेक मान्यवरांनी राजवाड्यात जाऊन जिजाऊंच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर दुपारी विविध कार्यक्रम पार पडले.दरवर्षी नगर पालिकेच्या वतीने शासकीय सोहळा म्हणून पौष पौर्णिमेलाच अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी पौष पौर्णिमा आणि तारखेप्रमाणे राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव हा १२ जानेवारीलाच आला आहे. जिजाऊ सृष्टीवर ४००हून अधिक पुस्तकांची दुकाने थाटली होती. येथील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या मूर्तीसमोर नागरिकांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. सायंकाळी शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात खा. संभाजीराजे म्हणाले, मी बहुजनांची विचारधारा मानणारा आहे. मराठ्यांचा, बहुजनांना आवाज मी संसदेत उचलणार आहे. ज्या घराण्यातून मी आलो त्यांचे विचार देशभर पसरविण्याचे कार्य मी करणार आहे. आगामी काळात प्रस्थापितांना लोक धडा शिकविणार असून, शेतकरी व शेतमजुरांचे राज्य येणार आहे, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गडकरींचा पुतळा उखडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार : पुण्याच्या संभाजी उद्यानातील भाषाप्रभू ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने नुकताच उखडून टाकला. यात सहभागी असलेल्या ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मातृतीर्थ गजबजले ! मान्यवरांचे अभिवादन
By admin | Published: January 13, 2017 4:15 AM