मुंबई: सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी आता राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दुपारी होणार सुनावणीमुंबई पोलिसांनीदाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीदेखील केली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे.
रविवारच्या सुनावणीत काय झालं?खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांना रविवारी वांद्रे येथील सुटीकालीन न्यायालयात हजर केले. राणा दाम्पत्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
राजद्रोहाचा गुन्हा का?
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरून त्यांना आव्हान दिले होते. १४९ अंतर्गत नोटीस बजावत शांतता ठेवण्यास सांगून परत जाण्यास सांगितले होते. मात्र त्या नोटीसला न जुमानता सरकारला आव्हान दिले. त्यामुळे १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.