लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सतत गुन्हे करणाऱ्या टोळींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागरीकरण, औद्योगिकीकरण वाढत असताना पोलिसांवरील ताणदेखील वाढत आहे. अशा स्थितीत गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठ्या गावांमधील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘रोडमॅप’ केला जाणार असल्याची माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलता सांगितले. ‘एक गाव एक सीसीटीव्ही कॅमेरा’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे चोऱ्या, दरोड्यासह अन्य गुन्ह्यांचा माग काढताना अडचण येणार नाही. या योजनेचा चांगला परिणाम दिसून येत आहे, असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयावर अधिकाऱ्यांच्या मार्फत पोलीस व्यसनमुक्तीच्या कार्यशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम तरुणांना जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, त्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून माहिती घेऊन विशेष कार्यशाळांचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडू नयेत, यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जागरूकता आहे. त्यामुळे पालकांनीदेखील शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची गरज आहे. घरातून निघालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळा महाविद्यालयात नियमित जातात का, याचीदेखील किमान महिन्यातून एकदा शाळा, महाविद्यालयप्रमुखांशी, शिक्षकांशी बोलून शहानिशा केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सायबर क्राईमच्या बाबतीतदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.अलीकडच्या काळात दरोडा, चोऱ्या करणाऱ्या टोळींवर लक्ष केंद्रित केले आहे. सातत्याने असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० ते ११ टोळ्यांवर या कारवाईची शिफारस वेगवेगळ्या तालुक्यात केली आहे, असे पखाले यांनी सांगितले.
सराईत टोळ्यांवर मोक्का
By admin | Published: July 14, 2017 1:33 AM