नाशिक : सरसकट कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव द्या, या मागणीसाठी लासलगावमधील शेतकºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत जोरदार घोषणाबाजी केली. तर मीडियासाठी केली जाणारी ही स्टंटबाजी असल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यावर उतारा म्हणून उपस्थितांना टाळ्या वाजविण्यास सांगितले. त्यामुळे एकीकडे टाळ्या आणि दुसरीकडे पोटतिडकीने घोषणा देणारे शेतकरी, असे चित्र दिसले.लासलगाव येथे ५ कोटी रूपये खर्चून देशातील पहिले अत्याधुनिक कांदा शीतगृह उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात झालेला हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला तो शेतकºयांच्या घोषणाबाजीने. फडणवीस यांच्या भाषणाप्रसंगी येवला येथील संतु पाटील-झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकºयांनी घोषणाबाजी केल्यामुळे सभेत पाच-दहा मिनिटे सभेत गोंधळ झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत मीडियाचे लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर झळकावी यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे सांगितले. ही स्टंटबाजी आहे. जनतेनेअशा लोकांकडे दुर्लक्ष करावे. टाळ्या वाजवून अशा अपप्रवृत्तीला विरोध करा, असे फडणवीस यांनी म्हणताच सभेत टाळ्यांचा एकच गजर झाला. दुसरीकडे एका कोपºयात शेतकºयांची घोषणाबाजी सुरूच होती.योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतीमालालाच ई- मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतक-यांना सक्षम करु, असा विश्वास, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखविला. राज्यभर रेल्वेचे चांगले जाळे निर्माण झाले तर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, त्यामुळेच रेल्वे मार्ग होण्यासाठी पन्नास टक्के खर्चही राज्य शासन करीत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.शीतगृहाचे काम एक वर्षात पूर्ण केले जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, सौ. प्रभु , खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार स्नेहलता कोल्हे, आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतक-यांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:01 AM