लोकमत न्यूज नेटवर्कनीरा (पुणे) : नीरा भीवरा पडता दृष्टी।स्नान करिता शुद्ध सृष्टी। अंती तो वैंकुठ प्राप्ती।ऐसे परमेष्टि बोलिला।।माउली-माउली नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तिर्थात शनिवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामी प्रवेश केला. रामायणकार वाल्मीकींच्या पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावचा सकाळी निरोप घेऊन सोहळा नीरानगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरींच्या समोर सोहळा विसावला. भाविकांनी भाजी-भाकरीची न्याहारी वारकऱ्यांना आणली होती. नीरानगरीत सव्वादहा वाजता सोहळा दाखल झाला. शिवाजी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नदीकिनारी असलेल्या नयनरम्य पालखीतळावर दर्शनासाठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले. दुपारचे एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला.
वैभवी लवाजम्यासह माउलींना नीरास्नान!
By admin | Published: June 25, 2017 1:40 AM