मीरा रोड : काशिमीरा भागातील ४५ वर्षीय सुरेंद्र यादव यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावरही मृताचे नातलग सुरेंद्र मरण पावल्याचे वास्तव स्वीकारायला तयार नव्हते. आपला विश्वासू मांत्रिक सांगेल तेव्हाच विश्वास ठेवू आणि मृतदेह ताब्यात घेऊ, असे सांगत नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर एका मौलवीला पाचारण करण्यात आले आणि त्याने मृत सुरेंद्रच्या तोंडावर पाणी मारून तो मरण पावल्याची खात्री पटवून दिल्यावर हा पेच संपुष्टात आला.मांडवी पाडा भागात राहणाऱ्या सुरेंद्र यादव याला सोमवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास साप चावला. सापाचे विष उतरवण्याकरिता लागलीच मांत्रिक उपलब्ध होणे अशक्य असल्याने आणि जवळपास कुठे उपचार शक्य नाहीत हे लक्षात आल्यावर सुरेंद्रला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. तेथे सव्वा नऊच्या सुमारास डॉक्टरांनी सुरेंद्रला मृत घोषित केले. त्याचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते. मात्र सुरेंद्रचे नातलग त्याचा मृत्यू झाल्याचे मानण्यास तयार नव्हते. तांत्रिक-मांत्रिकाकडे नेण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करून त्यांनी गोंधळ घातला. महापालिकेच्या इस्पितळातून शवविच्छेदन न करताच मृतदेह ताब्यात देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास व डॉक्टरांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रुग्णांच्या नातलगांनी एका मौलवीला आणले. अखेर डॉक्टरांनी परिस्थिती पाहून त्या मौलवीला सुरेंद्रच्या मृतदेहाकडे नेले. मौलवीने पाणी शिंपडून मंत्र म्हटल्यावरही सुरेंद्र जागा होत नाही हे पाहिल्यावर त्या मौलवीने तो मृत झाल्याचे सांगितले. दीर्घकाळ डॉक्टरांवर विश्वास न ठेवणाऱ्या नातलगांनी क्षणार्धात सुरेंद्रच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारले. शवविच्छेदन करून सुरेंद्रचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेंद्र हा लहान व्यवसाय करत होता. मूळचा उत्तर भारतीय असलेल्या सुरेंद्रच्या पश्चात पत्नी, ५ मुली व २ मुले असा परिवार आहे.
मृत घोषित करण्यासाठी मौलवी रुग्णालयात
By admin | Published: September 07, 2016 2:48 AM