मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे मविआ खासदारांची पाठ, अमोल कोल्हेंच्या हजेरीने तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:01 AM2023-01-31T09:01:00+5:302023-01-31T09:02:39+5:30
Maharashtra Politics: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील खासदारांनी पाठ फिरवली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अपवाद ठरले.
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील खासदारांनी पाठ फिरवली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अपवाद ठरले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्यातील खासदार, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीनही पक्षांचे खासदार गैरहजर होते. मात्र राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित राहून भूमिका मांडली.
केंद्र सरकारकडे राज्याचे प्रलंबित असलेले प्रस्ताव आणि प्रश्न याचा संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात खासदारांनी पाठपुरावा करावा यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी अशा पद्धतीची सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलवण्याची प्रथा आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत असून मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक एक दिवस आधी बोलावल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये नाराजी होती. त्यातच महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटातील तणावपूर्ण संबंध पाहता या बैठकीला न जाण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेऊन अप्रत्यक्ष या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र कोल्हे यांच्या उपस्थितीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.