आदेश रावल -
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्रातील आघाडीच्या जागावाटपावर. महाविकास आघाडीच्या अनेक बैठका दिल्ली ते मुंबईपर्यंत पार पडल्या आहेत; पण, अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. जागावाटपाची चर्चा चार जागांवर अडल्याचे सांगितले जात आहे. त्यात जालना, शिर्डी (राखीव), वर्धा आणि रामटेक या चार जागांचा समावेश आहे.
आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून लढविल्या जाणाऱ्या जागांसदर्भात चर्चा करण्यासाठी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल गुरुवारी मुंबईत पोहोचणार आहे. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतील आणि या चार जागांवर चर्चा करतील.
दुसरीकडे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आजच (गुरुवारी) होणार आहे. यात जवळपास १२ राज्यांतील लोकसभेच्या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. या जागांवर गुरुवारी निर्णय झाला नाही, तर पुन्हा हा मुद्दा काँग्रेसच्या पाच सदस्यीय समितीसमोर मांडला जाईल. त्यानंतर ही समिती या विषयावर चर्चा करेल. त्या चर्चेनंतर या १२ राज्यांतील जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचे समजते.