मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 06:24 AM2024-10-18T06:24:06+5:302024-10-18T06:25:20+5:30

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे  माध्यमांशी बोलताना सांगितले.

Mavia's Formula 100-80-80 Will announce the seat allocation in two days, there is no consensus on 'this' one thing! | मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

मुंबई : महाविकास आघाडीची मागील आठवड्यात थांबलेली विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा गुरुवारी पुन्हा सुरू झाली. आतापर्यंत एकूण २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले असून यातील १०० जागा काँग्रेसला, तर उद्धव सेना आणि शरद पवार गटाला प्रत्येकी ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित २८ मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या असून त्यावर दोन पक्षांनी दावा सांगितल्याने तो तिढा कायम असल्याचेही सांगण्यात आले. येत्या दोन दिवसांत जागा वाटप पूर्ण करून ते जाहीर करण्यावरही बैठकीत एकमत झाल्याचे  सूत्रांनी सांगितले.

आधी निकाल बघू, मग मुख्यमंत्री ठरवू !
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे  माध्यमांशी बोलताना सांगितले.

४० जागांवरचा पेच मिटला... आता उरल्या २८ जागा
मागील दीड महिन्यांपासून मविआतील जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात २२० जागांपर्यंत वाटप पूर्ण झाले होते. गुरुवारी सुरू झालेल्या चर्चेत उरलेल्या ६८ जागांवर चर्चा सुरू झाली. त्यापैकी ४० जागांवरील तिढा सोडवून त्या जागांचे वाटप करण्यात आले.  उरलेल्या २८ जागांवरील तिढा कायम आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमधील जागा असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

चोकलिंगम यांना भेटणार शिष्टमंडळ
मविआचे शिष्टमंडळ शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना भेटणार आहे. मतदान यादीतील संदिग्धता, मतदान व्यवस्थित होण्यासाठी केलेले उपाय, मतदान केंद्रावर मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या काही मागण्या मांडणार आहे.

आतापर्यंत झालेल्या जागा वाटपाची यादी काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे, शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना पाठवली जाईल. आता उरलेल्या जागांचा तिढा हे वरिष्ठ नेते चर्चा करून सोडवतील. दोन दिवसांत सर्व जागांची घोषणा आम्ही करू. 
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

समाजवादी पार्टीला हव्यात १२ जागा -
- मुंबई : मविआतून समाजवादी पार्टीला १२ जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी केली आहे. 
- काँग्रेसने समाजवादी पार्टीला विश्वासात घेतल्याशिवाय परस्पर आपल्या जागावाटपाची घोषणा करू नये. मतविभाजन टळावे हीच आमची इच्छा आहे. हरयाणात मतविभाजनाचा फटका बसला नसता तर काँग्रेसला जिंकणे शक्य होते, याची आठवणही आझमी यांनी करून दिली आहे. 
- महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र समाजवादी पार्टीला सोबत घेणार की नाही याची स्पष्टता झालेली नाही. 
 

Web Title: Mavia's Formula 100-80-80 Will announce the seat allocation in two days, there is no consensus on 'this' one thing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.