मविआचा महामोर्चा: ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच रस्त्यावर; राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:36 AM2022-12-18T06:36:04+5:302022-12-18T06:36:31+5:30
राज्यपालांना हटवले नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मुंबईतील रिचर्डसन ॲण्ड क्रुडास कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत महामोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
राज्यपालांना हटवले नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली.
हा महामोर्चा काढून विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. आघाडीतील तिन्ही पक्षांसह सीपीआयएम, समाजवादी पार्टी, शेकापनेही मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यात महाविकास आघाडीला यश आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ पोहोचला. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सीमावादावरही आक्रमक भूमिका
या मोर्चामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी अखंड महाराष्ट्राचे फलक झळकावत बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. नेत्यांनीही भाषणातूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध नोंदवला.
संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेच आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनांत सहभागी झाले होतेे. पण महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये पूर्ण ठाकरे कुटुंबच रस्त्यावर उतरले. पहिल्यांदाच रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे अशा मोठ्या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
पोलिस व आंदोलकांत अनेकदा बाचाबाची
जे. जे. फ्लायओव्हरवरून मोर्चाचे मार्गक्रमण झाले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना हटकणारे पोलिस आणि आंदोलक
यांच्यात अनेकदा बाचाबाची झाली. ती रोखण्यासाठी व्यासपीठावरून नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना करावी लागली.