लक्ष्मण मोरे, पुणे‘माय मरो, मावशी उरो’ असे म्हटले जाण्याइतके मावशीचे नाते प्रेमळ. मात्र, एका २३ वर्षांच्या मावशीचा लळा समजून एक तरुणी तिच्यातील ‘लेस्बियनीझम’ची शिकार बनली. समलैंगिक संबंधांच्या जाचासह पैशासाठी होणारे ब्लॅकमेलिंग अखेर असह्य होऊन तिने महिला साहाय्य कक्षाकडे तक्रार दिली. एखाद्या चित्रपटातील नव्हे, तर पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ही कहाणी आहे. अवघ्या १९ वर्षांची ‘ती’ आईवडिलांसोबत राहते. तिची २३ वर्षांची मावशीही दोन वर्षांपासून त्यांच्याकडे राहायला आली. आर्थिक परिस्थितीमुळे ‘ती’ एका डॉक्टरकडे कामाला जायची. काळजीपोटी मावशीही सोबतीला जायची. मावशीचे राहणीमान मुलांसारखेच. आधुनिक भाषेत अगदी ‘टॉम बॉय’ मुलगी. अविवाहित असल्यामुळे रिकामा वेळ भरपूर होता. काही दिवस सोबत राहिल्यामुळे तिला पीडित मुलीबद्दल आकर्षण निर्माण झाले. तिने या मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘टॉम बॉय’ मावशीने तिच्याशी जवळीक साधत समलिंगी संबंध निर्माण केले. काही दिवसांतच त्यांच्यातील ‘लेस्बियन’ नाते जगजाहीर करायची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितली.नाइलाजास्तव हे सर्व सहन करत असतानाच मावशीचा आक्रस्ताळेपणा वाढत होता. पैसे न दिल्यास आपले ‘लेस्बियन’ संबंध जगजाहीर करण्याची धमकी तिने दिली. या धमकीमुळे घाबरलेली मुलगी घरात अबोल झाली. तिचे जेवणावरचे लक्ष उडाले. एवढी मोठी रक्कम कोठून आणायची याचा सतत ती विचार करू लागली. मात्र, मावशीच्या धमक्या असह्य झाल्याने तिने धाडस करून आईला सर्व प्रकार सांगितला. स्वत:च्या बहिणीकडून पोटच्या मुलीबाबत होत असलेला अत्याचार ऐकून आईही सुन्न झाली. स्वत:ला सावरत तिने मुलीला घेऊन थेट पोलीस आयुक्तालयातील महिला साहाय्य कक्षामध्ये धाव घेतली. तक्रार दाखल केली. पोलिसांनी मावशीला चौकशीसाठी बोलावले. सोबत पीडित मुलीच्या आजी-आजोबांनाही बोलावले. महिला अधिकाऱ्यांनी या मावशीला खडे बोल सुनावत कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, असे बजावताच आजी-आजोबांनी बहिणींमध्ये मध्यस्थी करीत प्रकरण न वाढवण्याबाबत विनंती केली. वार्धक्याचा हवाला देत त्यांनी मुलीसमोर हात जोडले. शेवटी तडजोड झाली आणि प्रकरणावर पडदा पडला. पोलिसांनी मात्र दोघींचा जबाब नोंदवत कार्यवाही पूर्ण केली.पीडित मुलीने मावशीविरुद्ध पोलीस आयुक्तालयातील महिला साहाय्य कक्षामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. आईवडील नोकरीसाठी घराबाहेर पडले की मावशी मुलीला गोडगोड बोलायची. मोकळ्या वेळेत तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी करायची. जेवणापासून आवडीनिवडीपर्यंत सर्व गोष्टी पुरवायची. महागड्या भेटवस्तू द्यायची. यामुळे भारावून गेलेली मुलगी मावशीच्या अधिक जवळ येत गेली. मावशीबद्दलचे तिचे प्रेम दृढ होत गेले. याचा गैरफायदा घेत मावशीने तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधायला सुरुवात केली. मुलीने मावशीच्या या कृत्याला विरोधही केला. मात्र, तिच्या आग्रहापुढे तिचे काही चालत नव्हते. काही दिवसांनी या दोघींमध्ये समलैंगिक संबंध प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली. मुलीने विरोध केलाच तर मावशी तिला बदनामीची धमकी देऊ लागली.
मावशीच्या लळ्याने तरुणी ‘लेस्बियनीझम’ची शिकार
By admin | Published: March 11, 2016 1:59 AM